
मुंबई : कर्नाटकला जशाच तसे उत्तर देण्यासाठी सीमा प्रश्नावर समन्वयासाठी नेमलेल्या समितीने ३ डिसेंबरचा बेळगावचा दौरा दोन दिवस म्हणजे ६ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा इशारा दिल्याने राज्य सरकारने उद्याचा बेळगाव दौरा रद्द केला आहे. दरम्यान कर्नाटक – महाराष्ट्र सीमा वाद आणखी चिघळू नये, यासाठी माघार घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले.

सरकारच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोट जतसह विविध ४० गांवावर दावा केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. हा वाद पेटला असतानाच कर्नाटकने जत गावात पाणी सोडून महाराष्ट्र सरकारला डीवचले. कर्नाटक सरकारच्या सततच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची समिती नेमली. या समितीने शनिवारी 3 डिसेंबर रोजी बेळगावचा दौरा करण्याचे जाहीर केले. मात्र स्थानिकांच्या मागणीमुळे दोन दिवसांपूर्वी हा दौरा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
