
आरोग्य टिप्स: सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सकाळी चालणे खूप गरजेचे आहे.
आपण अशा वातावरणात राहतो जिथे अनेक आजाराचे मूळ हे नैराश्य अर्थात डिप्रेशन आहे. अनेक आजारांच्या मागे हे एकच कारण दिसून येते. हा आजार दिसत नसला तरी यामुळे अगदी मृत्यू ओढवतो इतका हा आजार भयानक आहे. पण तुम्हाला या आजारातून सकाळी चालण्याने नक्कीच फायदा मिळू शकतो. सकाळीच लवकर उठून चालायला गेल्याने मन स्वस्थ राहते आणि अंगातील आळसही निघून जाण्यास मदत होते. सकाळी चालण्याने मन हलके होते आणि डोकंही शांत राहण्यास मदत मिळते. नैराश्यग्रस्त व्यक्ती जर रोज सकाळी 20-40 मिनिट्स चालली तर नैराश्याचा स्तर कमी झाल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
डिप्रेशनमधून निघण्यासाठी तुम्ही रोज सकाळी किमान अर्धा तास तरी चालायला हवे. मॉर्निंग वॉक अर्थात सकाळी चालण्याचा सर्वात मोठा फायदा मिळतो तो हृदयाला. सकाळी नियमित चालण्याने तुमचे हृदय अधिक मजबूत होते आणि हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका कमी असतो. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांना नेहमीच डॉक्टरही चालण्याचा सल्ला देतात. यामुळे रक्तप्रवाह चांगला आणि सुरळीत राहतो ज्यामुळे हृदयाला धोका राहात नाही. एका शोधानुसार सकाळी चालण्यामुळे हृदयसंबंधित धोका साधारणतः 31 टक्के आणि मरण्याचा धोका 32 टक्के कमी होतो. पुरूष आणि महिलांना दोघांनाही याचा फायदा होतो.
मधुमेही व्यक्तींना सर्वात पहिला सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो तो म्हणजे सकाळी चालायला जाणे. मधुमेह हा अनियंत्रित जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. पण तुम्ही सकाळी चालायला गेल्यामुळे ही समस्या काही प्रमाणात तुम्ही आटोक्यात आणू शकता. केवळ सकाळी अर्धा तास चालल्याने तुमच्या शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तर टाईप – 2 चा मधुमेह संपुष्टात आणण्यासही याची मदत मिळते. तुम्ही तुमच्या खाण्याच्या वेळा पाळण्यासह आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासह सकाळी चालण्याचा फायदाही मधुमेहासाठी करून घेऊ शकता. आहार नियंत्रणासह सकाळी चालण्याचा उत्तम फायदा म्हणजे वजन कमी होते.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हा उत्तम उपाय आहे. अनियंत्रिण खाणे आणि वाईट जीवनशैलीमुळे वजनवाढ ही सध्याची समस्या झाली आहे. शारीरिक परिश्रमाशिवाय आपल्याला खाणे पिणे हवे असते. त्यामुळे वजन वाढू लागते. पण यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज न चुकता तुम्ही सकाळी किमान अर्धा तास ते पाऊण तास चालयला हवे. याचा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी होते.
सकाळी चालण्याचे फायदे पाहिले तर त्यामध्ये ऑक्सिजनचा चांगला पुरवठा मिळून थकवा निघून जाण्यास मदत मिळते. दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि थकल्यासारखे वाटत नाही. सकाळी ताजी हवा शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करते आणि तुम्हाला दिवसभर त्यामुळे थकवा आल्याचे जाणवत नाही
