
सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर कोेश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खा.छ. उदयनराजे भोसले सध्या महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वर्तुळाचे आकर्षण ठरले आहेत. राजेंच्या चालीने पवारांना उकळ्या फुटल्या असून या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजेंची सोमवारची खेळी आणखी कोणता डाव रचणार याकडे आता राज्याचे लक्ष आहे.
उदयनराजे सोमवार, दि. 28 रोजी पुण्यात महत्त्वपूर्ण घोषणा करत असल्याने त्यांच्या राजकीय मुव्हकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच घोषणेच्या पूर्वसंध्येलाच इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व खा. छ. उदयनराजे भोसले यांची खुमासदार भेट झाली. दोघांमध्ये मिश्किली रंगली व गमती-जमतीही झाल्या. खा. शरद पवार यांना खळखळून हसवणार्या उदयनराजेंनी येता येता राज्याचे विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांचा हातही दाबला. त्यामुळे सध्या हे वातावरण चर्चेचा विषय ठरले आहे.
