
थंडीच्या दिवसांत आवर्जून मॉईश्चरायजर लावतो. पण मॉईश्चराजरचा इफेक्ट थोडा वेळ राहतो आणि काही वेळाने पुन्हा त्वचेला खाज येणे किंवा कोरडेपणा कायम राहतो. अशावेळी मॉईश्चरायजरची निवड करताना आणि ते लावताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणजे त्वचा तर चांगली राहीलच पण आपण लावत असलेल्या मॉईश्चरायजरचा चांगला उपयोगही होईल. तसेच मॉईश्चरायजर लावण्याबाबत आपल्याकडे काही गैरसमज असतात ते वेळीच दूर करुन योग्य पद्धतीने त्याचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पाहूया मॉईश्चरायजरबाब कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची.
आपण साधारणपणे सकाळी किंवा रात्री झोपताना मॉईश्चरायजर लावतो. ते ठिक आहे, पण मॉईश्चरायजर हे त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी असल्याने ते कोरड्या अंगावर लावल्यास त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे अंग ओले असताना त्यावर मॉईश्चरायजर लावायला हवे. त्यामुळे ते योग्यरितीने शरीरावर पसरते आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. म्हणून आंघोळ झाल्या झाल्या लगेचच मॉईश्चरायजर लावायला हवे.
काही जण घराबाहेर पडताना चेहरा कोरडा दिसत असल्याने मॉईश्चरायजर लावतात. बाहेर जाताना त्वचा तात्पुरती एकसारखी दिसण्यासाठी याचा उपयोग होतोही. पण बाहेरील धूळ किंवा प्रदूषण हे या चेहऱ्यावर चिकटल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे मॉईश्चरायजर त्वचेमध्ये चांगले मुरल्यानंतर चेहरा किंवा हात पूर्ण कव्हर होतील अशी काळजी घेऊन मगच घराबाहेर पडायला हवे.
