शिरोली येथील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

शिरोली (पु.): ग्रामपंचायत शिरोली पु.( ता.हातकणंगले) येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने कोटयावधींचा भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणे कामे केली आहेत. त्यामुळे या सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंग चव्हाण यांच्याकडे देण्यात आले.

निवेदनात म्हंटले आहे की, आम्ही तक्रारदार शिरोली (पु.) गावचे रहिवासी असून एक सुजाण नागरिक म्हणून ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती घेतली असता आम्हाला ग्रामपंचायत कारभारामध्ये गैरव्यवहार असल्याचे निदर्शनास आलेले आहे व त्याची खात्रीही झालेली आहे. विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अधिकारांचा गैरवापर करून त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या आप्तस्वकीयांना आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने अनेक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या गाड्या असूनही घनकचर्याचा उठाव करण्यासाठी भाड्याच्या बोगस गाड्यांचा वापर दाखवून गावात कोठेही न झालेल्या कामांची मागील ३ वर्षामध्ये जवळपास २३,५१,४९७ रुपयांचे खोटी, बोगस व्हाउचर तयार करून बिलं काढलेली आहेत.

तसेच कचरा व्यवस्थापनासाठी जेसीबीचा वापर वारंवार दाखवून कोणतेही इस्टीमेट अथवा मूल्यांकन न घेता मागील ३ वर्षामध्ये जवळपास २६,३७,६३३ रुपयांचे बेकायदेशीर चेक काढलेले आहेत. तसेच शौचालयाचा मैला उपशाचे कामही वारंवार केलेले आहे आहे दाखवून एकाच व्यक्तीच्या नावे मोठया रकमेचे चेक काढलेले आहेत. रस्त्यांसाठी लागणारा मुरूम आणला म्हणून कागदोपत्री दाखवून ३ वर्षात १५,०९,०२७ इतके रुपये उचलले आहेत. दिवाबत्तीची व सादिलवार खरेदी मध्येही विना जी. एस. टी. ची खोटी बिले कागदोपत्री दाखवून ३ वर्षामध्ये २८,११,३०२ रुपयांचे चेक काढलेले आहेत, तसेच डागडुजीच्या नावाखाली ही लाखोंची डुप्लिकेट बिलं दफ्तरी दाखवून चेकने मोठया रकमा ग्रामपंचायती मधून काढलेल्या आहेत.

इतकंच नव्हे तर जीवन प्राधिकरण कडून ग्रामपंचायतीस पाणीपुरवठ्याची योजना वर्ग झाल्यानंतर बेकायदीशीर रित्या पाणीपुरवठा कनेक्शन दिले गेले आहेत , अनेकांकडून कनेक्शन देण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली गेली आहे त्याची नोंद कोठेही दप्तरी दिसून येत नाही आहे. तसेच विद्यमान सरपंचानी तर सर्व हद्द ओलांडून गावच्या सीमेच्या बाहेर असलेल्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या हॉटेलसाठी अधिकाराचा गैरवापर करून पाण्याची पाईपलाईन नेली आहे. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीतही जर भ्रष्टाचार होत असेल तर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे.

याशिवाय जिल्हा परिषदेकडून ब्लॅकलिस्टेड असलेल्या ठेकेदाराला कामं देऊन आर्थिक हित साधून घेणे, अतिरिक्त कर्मचारी खर्च, प्रत्यक्षात होणार्या औषध फवारणीपेक्षा जास्त औषधाचा वापर दाखवून पैसे घेणे. गावतलाव सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा निधी शासनाकडून मिळाला तरी मंजूर असलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे अजिबात काम न करता त्यातही मखलाशी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.

या निवेदनामध्ये नागरिकांनी विनंती केली आहे की, पूर्ण ५ वर्षांचे म्हणजेच १ एप्रिल २०१८ पासून ते आजतागायत शिरोली (पु.) ग्रामपंचायतीमार्फत या तिघांच्याही अधिकारात घेतलेल्या सर्व निर्णयांची व झालेल्या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषी असणार्या वरील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून भ्रष्टाचाराला आळा घालावा.

यावेळी कृष्णात करपे, सुरेश पाटील, डॉ.सुभाष पाटील,सतीश पाटील,योगेश खवरे, दीपक यादव, भैय्या कौंदाडे, लखन घाटगे, दिलीप शिरोळे, महम्मद महात आदी उपस्थित होते.

🤙 9921334545