गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भुदरगड तालुक्यातील आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र असलेल्या गारगोटी ग्रामीण रूग्णालयास राज्य सरकारने उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला असून यासाठी १६ कोटी ३५ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. सद्यस्थितीमध्ये या रुग्णालयाचे काम अंतिम ट्प्यात असून आवश्यक असणारे डॉक्टर्स व कर्मचारी उपलब्ध करण्याची देखील प्रक्रिया देखील सुरू आहे. तालुक्यातील गरीब व सर्वसामान्य नागरीकांवर खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गारगोटीचा महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश आले असून ग्रामीण रुग्णालय, गारगोटीचा महात्मा जोतीबा जन आरोग्य योजेनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेंतर्गत गरीब व आर्थिक दुर्बल, वंचित नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो. यामध्ये ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. तालुक्यातील अनेक गोर-गरीब व सर्वसामान्य नागरीक गारगोटी येथे उपचारासाठी येत असतात. सदर रुग्णालयाचा समावेश या येाजनेत झाल्यामुळे तालुक्यातील गोर-गरीब व सर्वसामान्य नागरीकांना चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मोफत मिळणार आहेत. सदरच्या रुग्णालयाचा या योजनेत समावेश करण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य लाभले असून या योजनेचा लवकरच शुभारंभ होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.