कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने राजाराम बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला होता. सदरच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सात फुटांनी वाढ झालीय. तसेच जिल्ह्यातील सहा बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

परतीच्या पावसामुळे अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग केला जात आहे. धरणातून सध्या कृष्णा नदीपात्रात 1 लाख 17 हजार 951 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणात सध्या 104.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणात 231.89 दलघमी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणातून 500 क्युसेकने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ बंधारा पाण्याखाली आहे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड आणि वारणा नदीवरील तांदूळवाडी पूल पाण्याखाली गेला आहे.