कसबा बावडा : एकीकडे सभा सुरळीत चालवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असताना, दुसरीकडे आमच्या विरोधकांनी मेळावा घेऊन सवयीप्रमाणे टिकाटिप्पणी केली. रात्रंदिवस फक्त ७/१२ आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का ? असा प्रश्न कधी कधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडतो. राजाराम कारखान्यात मागील ३० वर्षे आम्ही सत्तेत असताना कारखान्याचा ७/१२ आणि नाव आहे तसे जपले. याउलट सतेज पाटलांनी मात्र सप्तगंगा साखर कारखाना ताब्यात घेताच पुढील ५-१० वर्षात त्या कारखान्याचे नाव बदलले. एवढंच नाही तर १०,००० सभासद एका रात्रीत कमी केले. कारखान्याचे जाऊदे, किमान ‘अजिंक्यतारा’ या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा ७/१२ आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, एवढं तरी त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान माजी आमदार, राजाराम साखर कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी दिले.

लपूनछपून सभा घेणे ही आमची पद्धत नाही
महाडिक म्हणाले, श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी होत आहे. कुठल्यातरी कोपऱ्यात लपूनछपून सभा घेणे ही आमची पद्धत नाही. महाडिक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सभासद बंधू या सभेला उपस्थित राहतील व राजाराम कारखाना योग्य हातातच आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील.
डी. वाय. पाटील कारखान्याची वार्षिक सभा कधी होते? अहवाल छापला जातो का?
ते पुढे म्हणाले, आज डी. वाय. पाटील साखर कारखान्याची वार्षिक सभा कधी होते ? अहवाल छापला जातो का नाही ? हेही तिथल्या सभासदांना माहिती नाही. त्यामुळे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे वार्षिक सभा आणि निवडणूक आली की, राजाराम कारखान्याबद्दल बोलण्याची सवय त्यांनी थांबवावी. राजाराम साखर कारखान्याचा कारभार अतिशय उत्तमरित्या सुरू आहे. सभासदांना ऊस बिले वेळेत दिली जातात, कामगारांचे पगार वेळेत होतात. सभासद साखर असो किंवा सभासदांसाठीच्या विविध ऊस विकास योजना असोत सर्वच बाबतीत कारखान्याचे कामकाज उल्लेखनीय आहे. त्यामुळे कारखान्याच्या कारभारावर कुठेही बोट ठेवायला जागा नाही आणि हीच कारखान्याची प्रगती आमच्या विरोधकांसाठी अडचणीची ठरत आहे. ज्यांनी स्वतः सहकाराचा गळा घोटण्याचं पाप केलं, २-२ पिढ्यांनी मिळून शासकीय जमिनी लाटल्या, देवस्थानच्या जमिनी लाटल्या, विद्यापीठं लुटली.. त्यांनी ३ दशकं सहकार टिकवणाऱ्यांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडूच नये, असा इशारा अमल महाडिक यांनी दिला.
उंदराला मांजर साक्ष
आज ज्या सभासदांना बोगस सभासद म्हणून बाजूला काढण्याचा घाट घातला जातो आहे, त्या सर्वाना सभासदत्व देताना सतेज पाटील यांचे सहकारी कै. विश्वास नेजदार हेच चेअरमन होते. आज उंदराला मांजर साक्ष असल्याप्रमाणे जे सर्जेराव माने त्या व्यासपीठावर बसलेत, ते तेव्हाही संचालक होते. याच सभासदांनी २० वर्षे त्यांनाही मतदान केलेलं आहे. त्यामुळे आता या सभासदांवर बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार सतेज पाटील आणि त्यांच्या गटाला नाही. या सर्व सभासदांच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू, असे महाडिक म्हणाले.
गावगुंडाप्रमाणे धमकीची भाषा वापरू नये ; महाडिकांसाठी बावडा परका नाही
अमल महाडिक म्हणाले, काल मेळाव्यात त्यांनी, “सभेनंतर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल” अशी धमकी दिली. आताच जर या लोकांची ही भाषा असेल, तर यांच्या नजरेत इतर १२१ गावच्या सभासदांची काय किंमत आहे ? याचा विचार हे उरलेल्या १२१ गावातील सभासद नक्कीच करतील. शेवटी हा कारखाना सर्व सभासदांचा आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. किमान आपण कोणत्या पदावर आहोत, याचा तरी विचार त्यांनी करावा आणि ही गावगुंडासारखी भाषा बंद करावी. राहिला प्रश्न वैयक्तिक आमचा व आमच्या समर्थकांचा तर मागील ३० वर्षं आम्ही बावड्यात येतो. बावड्यातील अनेक लोकांशी आमचेही सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे आम्हाला बावडा परका नाही. त्यांनी विनाकारण बावडा त्यांची जहागीर असल्यासारखी वक्तव्ये करून बावड्याची बदनामी करू नये.
जशास तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ
महाडिक म्हणाले, याआधीही बऱ्याचदा त्यांनी पातळी सोडून टीका केली आहे, तेव्हा आम्ही दुर्लक्ष केलं. पण इथून पुढे तसं होणार नाही. त्यांच्याच शब्दात त्यांना उत्तर दिले जाईल. आणि त्याहीपुढे जाऊन सांगतो की, सभेच्या दिवशी जर जाणूनबुजून कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर त्याही बाबतीत जशास तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. तसा प्रसंग येऊ नये ही जबाबदारी आमची एकट्याची नाही तर दोघांचीही आहे. याचं भान ठेवूनच त्यांनी इथून पुढे वक्तव्ये करावीत. तसेच सर्व सभासदांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की, अशा धमक्यांकडे लक्ष न देता आपल्या सभासदत्वाचा हक्क बजावण्यासाठी नेहमीप्रमाणे याही वार्षिक सर्वसाधारण सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.