भविष्यातही शाहू कारखाना कुस्ती खेळाला प्रोत्साहन देईल : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतानिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती कलेला राजाश्रय दिला होता. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मॅटवरील कुस्ती स्पर्धा सुरू करून लोप पावत चाललेल्या कुस्ती कलेला स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी उर्जित अवस्था दिली. हाच वारसा पुढे चालविताना भविष्यात शाहू कारखाना कुस्ती खेळाला प्रोत्साहन देईल, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कागल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सलग 36 व्या वर्षी आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बालगटात विक्रमी 286 मल्लांनी नोंदणी केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे सर्व संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

घाटगे पुढे म्हणाले, शाहू साखर कारखान्याने कुस्तीसह सर्वच खेळांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील मल्लांना प्रोत्साहन मिळत आहे. या मॅटवरील कुस्ती स्पर्धेतील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवरही चमकतील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा, स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे, क्रीडापटू स्व. नागेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मॅट पूजन घाटगे यांनी केले. ध्वजारोहण व क्रीडा ज्योतीचे प्रज्वलनही घाटगे यांनी केले. कारखान्याच्या मानधनधारक खेळाडूंनी मानवंदना व क्रीडा शपथ दिली. शाहू उद्यान येथून स्पर्धा स्थळापर्यंत क्रीडा ज्योत उत्साहात आणली.

चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेत पंच म्हणून संभाजी वरुटे, बटू जाधव, नामदेव बल्लाळ, बाळासो मेटकर, दत्तात्रय एकशिंगे, अशोक फराकटे, मलकारी पुजारी, प्रकाश खोत, रवींद्र पाटील, सुरज मगदूम,कृष्णा पाटील हे काम पाहत आहेत. राजाराम चौगुले स्पर्धेचे निवेदन करत आहेत. स्वागत व प्रास्तविक उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले.

ऑलम्पिकच्या धर्तीवर नेटके नियोजन

आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलम्पिक स्पर्धेत वापरण्यात येणाऱ्या संगणकीय गुण फलकासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ही स्पर्धा होत आहे. हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण आहे.संगणकीय गुणफलकामुळे मल्ल, वस्ताद यांच्यासह कुस्ती शौकिनांना ही कुस्ती नेमक्या कोणत्या अवस्थेत आहे. याबाबत अचूक माहिती मिळणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे कुस्ती हेच जीवन व महाखेल स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवरून ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येत आहे .

🤙 9921334545