आम्ही निवडून आलेलो त्यांना सहन न झाल्यानेचं त्यांचा हा कुटील डाव-बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर

कोल्हापूर प्रतिनिधी : मी आणि खासदार संजय मंडलिक निवडून आलेलो काही लोकांना सहन झालेले नाही. हा कुटील डाव डोक्यात ठेऊनच त्यांनी गटाची विभागणी केली. नव्या विषयाला सभासदांची मंजुरी नसतानाही हा विषय जबरदस्तीने मंजूर करण्यात आला आणि हि सभा आटोपण्यात आली, असा आरोप बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सत्ताधारी आघाडीवर केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेनंतर बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सभागृहाच्या बाहेर समांतर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज शुक्रवारी ८४ वी सर्वसाधारण सभा पार पाडली. मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात ही सभा पार पडली. नव्या विषयाच्या मंजुरीवरून सभेत गोंधळाचे वातावरण तयार झाले. यानंतर बँकचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सभा संपताच सभागृहाच्या बाहेर काही सभासदांना घेऊन समांतर सभा घेतली.

सभासदांना विचारात न घेता आणि त्यांची मंजुरी नसतानाही नवा विषय जबरदस्तीने मंजूर करण्यात आला. आणि घाईघाईने राष्ट्रगीत सुरु करून सभा आटोपण्यात आली असही पाटील यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित बँकेच्या सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या नावाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.