कसबा बावडा प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे केमिकल विभागाच्यावतीने आज गुरुवारी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, समूह चर्चा स्पर्धा इ. स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र व कौशल्य विभाग संचालक डॉ.ए.एम. गुरव यांचे उद्योजकता प्रकल्प व प्रोडक्ट डेव्हलपमेंट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. गुरव यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामधील उदाहरणे देऊन संशोधन, उद्योजकता, नाविन्य आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहित केले. अनेक उद्योजक कसे घडले याबतची माहिती दिली. उद्योजक होण्यासाठी सकारात्मक विचार, कल्पकता व प्राधान्यक्रमाचे महत्त्व ही त्रिसूत्री असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत व प्रस्तावना विभागाचे प्रमुख डॉ. अमरसिंह जाधव यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन डॉ. राहुल महाजन, कुमारी वैभवी घारे व प्रेरणा सुकटेकर यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रा. किरण पाटील, प्रा. प्रियंका पाटील, डॉ. राहुल पाटील, समीर वानखेडे, निकिता दिंडे विद्यार्थी प्रतिनिधी विश्वराज चौगुले व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.