ज्या आईने जन्म दिला, त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद


मुंबई : राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असं आपण म्हणत होतो. पण केवळ तसं नाहीये. राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे. पण तितकी ताकद त्यांच्यामध्ये नाही कारण आई ही शेवटी आई असते, असा घणाघात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच विषयांवर चर्चा केली.

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का?
महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेने उठाव केला असता. तसं झालं नाही, असंही अधोरेखित केलंय. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानाने सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं; असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

सडलेली पानं झडताहेत

सडलेली पानं झडताहेत

ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडकं झालंय असं दाखवायचा प्रयत्न करताहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो.

शिवेसनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. पक्षावर दावा केला त्यानंतर तुम्ही एवढे शांत कसे काय असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शांत कसा? खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे. म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या. इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोकं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया. ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना आव्हान केलं आहे.

🤙 8080365706