नवी दिल्ली (वृत्तसंस्था): जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भाला फेक प्रकारात नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. त्याने चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भालाफेक केली. भारताला जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षांनंतर पदक मिळाले. यापूर्वी लांब उडीमध्ये बॉबी जॉर्जने पदक जिंकले होते. या स्पर्धेत ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने 90.54 मीटर भाला फेकला.

यापूर्वी नीरज चोप्राने 2016 मध्ये ज्यूनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांने सुवर्ण पदक जिंकले होते. नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. मात्र, सुवर्ण गतविजेता अँडरसन पेटर्सने पहिल्याच प्रयत्नात 90.21 मीटर भालाफेक करत नीरज चोप्रासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर नीरजने 82.39 मीटर भाला फेकला. त्यामुळे तो यादीत चौथ्या स्थानावर पोहचला.
ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सने दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकासाठी नीरज समोर अजून मोठे आव्हान ठेवले. नीरज चोप्राने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकून आपली कामगिरी सुधारली. तो तिसऱ्या प्रयत्नानंतर तो पुन्हा चौथ्या क्रमांकावर आला. त्याने चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरले.