मुंबई/दिली: नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. त्यानुसार सोनिया गांधी चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान ईडीच्या कारवाई विरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली असून दिल्लीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.

दिल्लीत संसदेतही काँग्रेस खासदारांनी ईडी कारवायांविरोधात शांततेत आंदोलन केले. तर केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेस नेत्यांनीही मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन केले. सकाळी 11 वाजता जीपीओ चौकातून निघालेल्या या मोर्चात अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या दडपशाही व जनविरोधी निर्णयांच्या विरोधात सातत्यपूर्ण आवाज उठविणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मोदी सरकारच्या ईडीने एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्याचा आरोप काँग्रेस कर्त्यांनी केला आहे. याच निषेधार्थ संपूर्ण देशात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत मुंबईत काँग्रेस नेत्यांकडून केले जातेय. सीएसएमटी परिसरात काही काँग्रेस आंदोलकांनी जमा होत केंद्राविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली.