राज्यातील विकासकामांना स्थगिती नको; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ‘यांचे’ साकडे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली. राज्यातील अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

माहे जुलै २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात मोठया प्रमाणावर निवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीन राज्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या शंभरहून अधिक आहे. मृत नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत अद्याप पोहचलेली नाही. याबाबत तात्काळ पावले उचलून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ आधार देण्याची गरज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतजमिन व शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनावरे वाहून गेली आहेत. याबाबतचे पंचनामे तात्काळ करुन शेतकरी कुटुंबियांना याची नुकसानभरपाई देण्यात यावी. अतिवृष्टीग्रस्त भागात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जात नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत आपल्या स्तरावरुन संबधितांना सक्त सूचना देण्यात याव्यात. सर्व बाधीत क्षेत्रांचे पंचनामे तात्काळ करावेत. अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनांचे अपघात वाढले आहेत. यातून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ व्हावी, वाहनांचे अपघात थांबावेत व नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याच्या दृष्टीने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा. अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागात वीजवितरण व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण एकंदरित ऊर्जा विभागामार्फत तात्काळ उपाययोजना आवश्यक आहे. वरील विषयासंदर्भात तात्काळ पाऊले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे- पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.