नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया-समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी) : नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे  यांनी केले. तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थितीच्या आढाव्यासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह  शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संभाव्य पुर परिस्थिती व करावयाच्या उपायोजना याबाबत शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ते बोलताना पुढे म्हणाले, गतवर्षी सुळकुड, कागल, सिद्धनेर्ली, बानगे, करनूर, वंदूर, मुरगुड शहर आदी भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. या ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यक ती खबरदारी घ्यावी. प्रशासनानेही या ठिकाणी नागरिकांना वेळीच सावध करावे व आवश्यकता वाटल्यास स्थलांतर करून त्यांची राहण्याची व जेवणाची पर्याय व्यवस्था यांची नियोजन करावे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वयंसेवक म्हणून काही माजी सैनिक संघटना काम करण्यास तयार असल्याबाबत आपल्याशी संपर्क साधला आहे. तसेच नागरिकांना आवश्यक असणाऱ्या  साहित्य पुरवण्यासाठी उद्योजकांचीही बैठक घेऊ. अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे म्हणाल्या, संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता शासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर सज्ज ठेवली आहे. गतवर्षी पूर आलेल्या गावांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर स्वतंत्रपणे जबाबदारी देवून देऊन सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 

यावेळी घाटगे  यांनी गतवर्षीच्या महापुराच्या नुकसान भरपाईतील परत गेलेल्या रकमेचा मुद्दा उपस्थित केला. यावर श्रीमती ठोकडे यांनी पात्र वंचित लाभार्थी निदर्शनास आणून दिल्यास शहानिशा करून त्यांना भरपाई देण्याची व्यवस्था करू.अशी ग्वाही यावेळी दिली. या बैठकीस मंडल अधिकारी कुलदीप गवंडी, तलाठी दीपक लोहार, राजेंद्र जाधव, सतीश पाटील, नंदकुमार माळकर, आप्पासो भोसले, विवेक कुलकर्णी, अरुण गुरव, सुशांत कालेकर आदी उपस्थित होते.