नवी मुंबईत ‘राबाडा’चे झाले ‘रबाळे’

नवी मुंबई : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या शहरीकरणामुळे अनेक खेडी महानगरात बुडाली. अशा खेड्यांची मूळ नावेही डुबली. असाच प्रकार नवी मुंबईतील ‘रबाळे’ गावाचा घडला…आणि त्याचे ‘राबाडा’ झाला.

मुंबईचा विस्तार होत असतानाच तेथे परप्रांतीय संख्या वाढली. त्यांना मराठीतील अनेक अवघड शब्द उच्चार करता येत नाहीत. त्यामुळेच रबाळेचे राबाडा झाले. हा अपभ्रंश खोडून काढत मराठी एकीकरण समिती सदस्यांनी सरकार दरबारी खटाटोप करून मूळ नाव मिळवून दिले. म्हणूनच त्यांनी महानगरपालिका आयुक्त, अधिकारी, महसूल विभागाचे आभार मानले.

हिंदी भाषीक परप्रांतीयांना ‘ळ’, ‘ण’ असे वर्ण उच्चारता येत नाहीत, लिहीता येत नाहीत. याचे समर्पक उदाहरण म्हणजे मूळ ‘रबाळे’ या मराठमोळ्या गावाच्या नावाचा ‘रबाडा’ असा अपभ्रंश झाला !!

स्थानिक नागरीकांना व त्या हमरस्त्यावरील प्रवाश्यांनाही, या भाषेवरील अतिक्रमणाच्या प्रभावामुळे ‘राबाडा’ हेच मूळ नाव असावे, असा संभ्रम निर्माण होऊ लागला होता. आपल्या गावचे, तलावाचे नाव दुषीत झाल्याबाबत राजकारणी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनाही याची खंत नव्हती. मराठी एकीकरण समितीच्या शिलेदारांनी अनेक महीने, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल नोंदी, पालिका अधिकारी, ‘आपले सरकार’ यांच्याकडे तक्रार-अर्ज, लेखी सुचना, चर्चा, पाठपुरावा करुन, या प्रकरणी योग्य तो बदल घडवून आणला. कोणत्याही प्रकारे श्रेय मिळविण्याची लालसा न करता, समितीने चिकाटी व सातत्यपूर्ण कार्य यामुळे, आज हे यश मिळाले. त्या सर्व शिलेदारांचे कौतुक आहे, असे प्रदीप सामंत, कार्याध्यक्ष मराठी एकीकरण समिती यांनी म्हटले आहे.