चांगल्या कारभारामुळेच सभासद सत्ताधारी स्वाभिमानी आघाडीच्या पाठीशी : प्राचार्य अर्जुन कुंभार

मुरगुड (प्रतिनिधी) : सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणारी व सभासद हिताच्या कारभारामुळे कोजिमाशि पतसंस्था संपूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्राला आदर्श आहे. प्रतिवर्षी दिला जाणारा लाभांश, दीपावली भेट,अपघात विमा, महिला सखी मंच, कोविड काळात सभासदांना केलेली मदत या योजनांमुळे कोजिमाशि ही केवळ संस्था नसून शिक्षक वर्गाचे समृद्ध कुटुंबच आहे. संस्थेच्या या सभासद हिताच्या चांगल्या कारभारामुळे स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीच्या पाठीशी जिल्ह्यातील संपूर्ण सभासद निश्चितपणे राहतील व मताधिक्यांनी विजयी करतील, असा विश्वास सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कुंभार यांनी व्यक्त केला.

मुरगुड येथे आयोजित केलेल्या कागल तालुका प्रचार मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वाभिमानी आघाडीचे प्रमुख दादा लाड म्हणाले, कोजिमाशि ही शिक्षकांची मातृसंस्था आहे. या संस्थेत सभासद हिताच्या योजना राबवून संपूर्ण राज्यात संस्थेचा नावलौकिक झाला आहे. विरोधकांनी कोजिमाशिच्या कारभारावर बोलावे, खोटे नाटे कोणतेही आरोप करू नयेत. संस्थेने सभासदांच्या सुखदुःखात साथ दिली आहे. सभासदांची घरे उभारली. मुलांच्या शिक्षणासाठी, आजारपणात संस्था उपयोगी पडली आहे. काटकसरीचा कारभार करूनच संस्था चालविलली आहे त्यामुळे कोणतीही दिशाभूल करून विरोधकांच्या ताब्यात संस्था कदापिही जाणार नाही. यापुढे कर्जाचा व्याजदर एक अंकी केला जाणार आहे. मेडिक्लेम योजनाही सुरू करण्याचा मानस आहे.

विनाअनुदानित शाळा संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे म्हणाले, सत्ताधारी स्वाभिमानी आघाडीकडे सभासदांची मोठी जनशक्ती आहे. विरोधी आघाडीकडे सुप्तपणे राजकीय शक्ती आहे. जनशक्ती असलेल्या सत्ताधारी आघाडीचाच विजय निश्चित आहे. विरोधकांकडे संस्थेच्या विकासाचा कोणताही मुद्दा नाही, केवळ टीका करण्याचेच त्यांचे काम सुरू आहे. सभासदांनी गाफील न राहता आघाडीच्या प्रचारात कार्यरत राहावे. मेळाव्याचा शुभारंभ चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचारी व महिला सभासदांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार झाला.
संचालिका सुलोचना कोळी यांचेही मनोगत झाले.
यावेळी जय शिवराय शिक्षण संस्थेचे कार्यवाह आण्णासाहेब थोरवत, माजी चेअरमन राजेंद्र रानमाळे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवार अविनाश चौगुले यांनी स्वागत केले. एम.बी.टिपुगडे यांनी प्रास्ताविक केले. संस्थाध्यक्ष बाळ डेळेकर यांनी आभार मानले.

🤙 9921334545