मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष पेटलेला असून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या राजकीय नाट्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे ते आता ‘नॉट रिचेबल’ होणार आहेत.
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून, मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असंही अजित पवार ट्विट करत म्हणालेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र काही वेळेनंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्टमध्ये त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काल रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे. राज्यपालांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता ते राजकीय घडमोडीत काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.