आजरा (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शिक्षक बँकेचा श्वास गुदमरला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी या निवडणुकीत बँकेत परिवर्तन करण्याचा ध्यास घेतला आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांनी केले. आजरा येथे राजश्री शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

तौंदकर म्हणाले, सत्ताधारी संचालक मंडळाने कोअर बँकिंग प्रणाली असताना १२८ कर्मचारी स्टापिंग पॅटर्न मंजूर करून आपल्या सग्यासोयऱ्यांची नोकर भरती केली. मुरगूड शाखेत चारशे सभासदांसाठी सात कर्मचारी काम करतात. त्यामुळे आमची आघाडी बँकेत सत्तेवर आल्यावर ९९ कर्मचारीवर्गावरच आम्ही शिक्षक बँक चालविणार आहोत. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभाराचा लेखाजोगा सभासदांसमोर मांडू. संचालक तुपाशी आणि सभासद उपाशी अशी परिस्थिती सध्या बँकेत आहे. या गोष्टींना आळा घालण्यासाठी सभासदांनी राजश्री शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान देऊन विजयी करावे.
शिक्षक संघ थोरात गटाचे अध्यक्ष रवीकुमार पाटील म्हणाले, बँकेचा लूक बदलणे, नातेवाईकांची भरती करणे, एटीएम मशीन यामधून सत्ताधार्यांनी आपला विकास करून घेतला आहे.
डीसीपीएस संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे म्हणाले, शिक्षक बँकेच्या वतीने डीसीपीएस धारकांच्या हिताच्या योजना राबवू.
आजरा तालुक्याचे उमेदवार शिवाजी बोलके, बँकेचे माजी संचालक रावसाहेब देसाई,धनाजी रावण, महेश शिंदे, सुरेश देशमुख, संजीव नाईक यांची मनोगते झाली.
यावेळी शिवाजीराव नांदिवडेकर, सुभाष विभुते, बळवंत शिंत्रे, सुनिल शिंदे, पांडुरंग रावण, अनुष्का गोवेकर, आनंदा कुंभार, रवी पाटील, जोतीराम पाटील,सुनिल पाटील आदी उपस्थित होते.