राज्यात राजकीय भूकंप; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर ईडीचा सुरुंग

जालना : राज्यात राजकीय भूकंप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्याला ईडीने सुरुंग लावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आलेले असताना शिवसेनेच्या एका नेत्यावर शुक्रवारी ईडीने कारवाई केली आहे.

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील साखर कारखान्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत साखर कारखान्याची जमीन जप्त करण्यात आली आहे. अवैध लिलाव केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचं समोर येत आहे. सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ईडीने जालन्यातील सावरगाव येथील साखर कारखान्याच्या जमिनीवर इडीने जप्ती आणली आहे. या कारवाईत ईडीने इमारत आणि संरचना, प्लांट आणि यंत्रसामग्रीवर टाच आणल्याची माहिती ईडीकडून मिळाली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता ७८.३८ कोटींची असल्याची माहिती दिली आहे.