नवाब मलिकांना दिलासा नाहीच; अनिल देशमुखांकडून वेट अँड वॉचची भूमिका

मुंबई : नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळली आहे. नवाब मलिक नवी याचिका दाखल करणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मतदानासाठी आपल्याला एक दिवसाचा जामीन मिळावा, अशी मागणी नवाब मलिकांनी याचिकेत केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयानं ती फेटाळून लावली आहे. तर अनिल देशमुखांच्या वतीनं वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे.

काल पीएमएलए कोर्टात नवाब मलिकांनीही घाईगडबडीने याचिका सादर केली होती, त्यावर न्यायालयानं आपला निकाल दिला होता. तीच याचिका मुंबई उच्च न्यायालयात ठेवण्यात आली. परंतु कैदी या नात्यानं जामीन देऊ शकत नाही हे न्यायालयानं स्पष्ट सांगितलं. तसेच तुम्हाला मतदानासाठी अधिकार देऊ शकतो, परंतु तशी याचिका सादर करावी लागेल. त्यात सुधारणेसाठी काही वेळ देण्यात आलेला आहे. नवाब मलिकांचे वकील याचिकेत सुधारणा करणार आहेत. केवळ आम्हाला बंदोबस्तात काही तासांकरिता विधान भवनात जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्याची परवानगी द्या, अशा आशयाची मागणी ते सुधारणा केलेल्या याचिकेतून करतील. त्यानंतर ही याचिका नव्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी ठेवली जाईल.

अनिल देशमुखांच्या वतीनं वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याकडून अजूनही याचिका दाखल झालेली नाही. नवाब मलिकांच्या निकालावर अनिल देशमुखांच्या मतदानाचं भवितव्य अवलंबून आहे.