मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीला धक्का आहे. महाविकास आघाडी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

राज्यसभा निवडणूक उद्या,१० जून रोजी होणार आहे. राज्यात २४ वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करण्यास परवानगी देण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी परवानगीला ईडीने विरोध केला होता. यावर आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडून युक्तीवाद झाल्यावर मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मतदानाचा अधिकार नसल्याचा निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे महाविकास आघाडीची दोन मतं कमी होणार आहेत. तर या निकालाविरोधात महाविकास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.