आमदार फोडण्यासाठी ईडी, सीबीआयची भीती दाखवली जातेय

मुंबई : भाजप अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे या पक्षांना आमिष प्रलोभन दाखवत आहे. शिवाय त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवत मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

प्रमुख नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी ते आम्ही निवडणूक लढवणार, या मतावर ठाम राहिले. त्यामुळे राजकारणात कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण जर त्यांनी निवडणूक लढायचा निर्णय पक्का केला असेल, तर महाविकास आघाडीसुद्धा या राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा मजबूतीने या निवडणुकीत उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे आणि या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजेच ते या पक्षांना आमिष दाखवणार, प्रलोभन दाखवणार, त्यांच्यावर वेगळ्यावेगळ्या मार्गाने दबाव आणणार. परंतु, हा दबाव कशाप्रकारे आणला जातोय याची माहिती आमच्याकडे रोज येतेय. ज्यांच्यावर भाजपा दबाव आणते ते, आमचेच मित्र असून, ते आम्हाला सांगत आहेत. शिवाय ईडी, सीबीआयची भीती दाखवते आहे. यामुळे भाजपाचे चारित्र्या उघड होतेय.”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्रात अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जात असतील, तर या राज्याची जनता डोळसपणे सगळं पाहातेय. सहावी जागा किंबहून चारही जागा महाविकास आघाडी अगदी व्यवस्थित जिंकणार आहे. त्यामुळे उगाच भारतीय जनता पक्षाने त्यांचे पैसे वाया घालवू नये. तेच पैसे एका सामाजिक कार्यात वापरावे’, असा सल्ला राऊतांनी दिला.