एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकिन

कोल्हापूर : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे.

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व सफाई कमीमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यूमागे हे सर्वात मोठे कारण असून, हा प्रश्न कमी करण्यासाठी  दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी नाममात्र एक  रुपयामध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे.

  सध्या महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.