३० जूनपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नयेत; शासन निर्णय जारी !

मुंबई : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३० जून २०२२ पर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

यासंदर्भात आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या सन २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी दि.३० जून, २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत.

तथापि, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास, अशी बदली मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता रा. कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.