ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचीट

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी एनसीबीने मुंबई सत्र न्यायालात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात आर्यनच्या नावाचा उल्लेख नाहीये. दरम्यान या चार्जशीटसंदर्भातील एनसीबीची एक प्रेस नोट समोर येत आहे. यात आर्यन खानसह ६ जणांवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

याप्रकरणी आर्यनला २ ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. २६ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्याला जामीन मंजुर झाला होता. एसआयटीच्या तपासानंतर 6 नोव्हेंबर रोजी जामीन मंजुर करण्यात आला होता. याप्रकरणी आर्यनसह १९ आरोपी होते. आरोपपत्रानुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एसआयटीला शाहरुख खानचा मुलगा आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाहीये. एनसीबीचे डीडीजी संजय कुमार सिंह यांनी सांगितल्यानुसार, आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळले. आता १४ जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित सहा जणांविरुद्ध पुराव्याअभावी तक्रार नोंदवली जात नाहीये.

आरोपपत्र समोर आल्यानंतर सुरुवातीला तपासाचे नेतृत्व करणारे एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हेही चौकशीच्या कक्षेत आहेत. आरोपपत्रानुसार, एसआयटीच्या तपासादरम्यान क्रूझवरील छाप्यातही अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर ही एसआयटी स्थापन केली होती.

🤙 9921334545