नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने जुन्या प्रकरणात एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
त्यांच्यावर कार पार्किंगवरून झालेल्या वादप्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू होती. हे प्रकरण ३४ वर्ष जुने आहे. नवज्योत आणि त्याच्या मित्राचा पटियाळा येथे कार पार्किंगवरून वाद झाला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून सिद्धूंना शिक्षा झाली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने हत्या करण्याचा हेतू नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणात दोन वर्षांनंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण नवे पुरावे सादर झाल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय बदलला. सिद्धूला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
रोड रेजचे प्रकरण १९८८चे आहे. पार्किंगवरून वाद झाला. सिद्धूने रागाचा भरात हात उगारला. सिद्धूचा मार लागल्यामुळे ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले. कनिष्ठ न्यायालयाने १९९९ मध्ये सिद्धूला ठोस पुराव्यांभावी निर्दोष सोडले. पंजाब हरयाणा न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवून तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सिद्धूने २०१८ मध्ये एक हजार रुपयांचा दंड भरून जामिनावर स्वतःची सुटका करून घेतली. यानंतर सिद्धूच्या याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल झाली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सिद्धूला दोषी ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा केली. सिद्धूने समाजकार्य करण्याच्या बदल्यात शिक्षेत माफी देण्याची मागणी केली आहे.