कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दर्जेदार आयटी हब प्रोजेक्ट तयार करण्यात येणार असून यादृष्टिने आयोजित केलेले एक्स्पो- 2022 प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल. यातून आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये सुमारे 600 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाची तर 300 हून अधिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्ह्यातील तरुण- तरुणी, सर्व महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी या आयटी एक्पो प्रदर्शनाला भेट द्यावी, कोल्हापूरकर आणि कोल्हापूरच्या बाहेरील व्यक्तींनीही कोल्हापूरच्या आयटी सेक्टरची घोडदौड पाहण्यासाठी आयटी एक्पो प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात दि. 18 एप्रिल ते 22 मे या कालावधीमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचं आयोजन केलं आहे. या अंतर्गत दि. 16, 17 व 18 मे रोजी शाहू मिल येथे आयटी फेस्टचं आयोजन केले आहे. या आयटी एक्स्पो 2022 प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कोल्हापूर आणि जवळपासच्या जिल्ह्यातील आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने स्टार्टअपची नोंदणी होत आहे. जुन्या कंपन्यांनासुध्दा विदेशातील कामाच्या संधी मिळत आहेत. या सर्व कंपन्यांची तयारी व्यावसायिकांसमोर आणण्यासाठीच या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोल्हापूरमध्ये तयार होणाऱ्या आयटी हब प्रोजेक्टसाठी सर्व कंपन्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
एक्स्पो 2022 प्रदर्शनात 130 स्टॉल लावण्यात आले आहेत. याठिकाणी कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक, प्रिंटर, लॅपटॉप, डेस्कटॉप, बारकोड स्कॅनर, धान्य व्यापार, सोनार, मेडिकल स्टोअर, कापड दुकानदार, उद्योग, व्यापार इत्यादींसाठी अकाउंटिंगचे सॉफ्टवेअर तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची सॉफ्टवेअर व त्याचे प्रात्यक्षिक उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग चे सॉफ्टवेअर, डिजिटल प्रिंटिंगसाठीचे सॉफ्टवेअर, होम ऑटोमेशन प्रॉडक्ट व सॉफ्टवेअर, अँटिव्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, अशी माहिती देवून या एक्स्पो प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन कम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर (सीएके) चे अध्यक्ष मोहन पाटील व आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर(आयटीएके) चे अध्यक्ष कैलास मेढे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रत्येक स्टॉलला भेट
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एक्स्पो प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली तसेच याद्वारे तरुणांना आयटी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवून देण्याबाबत चर्चा केली.