राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेसाठी पंधरा राज्यातील 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे.
येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने राज्य सभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीने राज्यसभेतील बरीच गणितं बदलणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या सहा खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातून 19 जागा आहेत. यात भाजपचे सात, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे तीन, रिपाई(आठावले गट) एक आणि एका अपक्ष खासदाराचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांची जागा पुन्हा निश्चित मानली जात आहे.