मुंबई : शेर शिवराज चित्रपटाला प्रेक्षकांनी विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ‘शेर शिवराज’चा डंका वाजत आहे. ‘फर्जद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ नंतर ‘शेर शिवराज’च्या रूपात ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटानं यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला.
परदेशांमध्ये सध्या १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये ‘शेर शिवराज’ पाहिला जात आहे. यात युएसएमधील २०, दुबईमधील १०, जर्मनीतील १०, युकेमधील ५, कॅनडातील ५, ऑस्ट्रेलियातील ४ शहरांचा समावेश आहे. याखेरीज फिनलॅन्डमध्ये ३, युएई, बहारीन, ओमानमध्ये ५ शोज सुरू आहेत. हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे. परदेशांमध्ये मराठी
चित्रपटाला मिळत असलेलं हे यश खूप मोठं आणि मराठी सिनेसृष्टीच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅलिफोर्नियास्थित फाइव्ह डायमेंशन एंटरटेनमेंटच्या सहकार्याने मुंबई मूव्ही स्टुडिओजने हे आंतरराष्ट्रीय वितरण केले आहे.
‘शेर शिवराज’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक सेंटरमध्ये शोजची संख्या वाढवावी लागली. तरीही प्रेक्षकांना तिकीट्स अपुऱ्या पडल्याचे चित्रपट अनेक ठिकाणी पहायला मिळाले. चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. ‘शिवबा राजं…’ या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन डान्स करत आहेत. डोक्यावर फेटे, पगडी, हातात भगवे झेंडे आणि मुखानं ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. हे दृश्य केवळ भारतातच नव्हे, परदेशातही पहायला मिळत आहे. परदेशामध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘शेर शिवराज’च्या गाण्यांचा बोलबाला होता. ‘शेर शिवराज’च्या रूपात ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेच्या मुकूटात आणखी एक माणिकरत्न जडलं गेलं आहे. ‘शिवराज अष्टक’ मध्यावर पोहोचले असताना ‘शेर शिवराज’ने एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, पुढील चित्रपटात दिल्लीचे तख्त राखण्यासाठी त्या दिशेने कूच करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चित्रपटाबाबतही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे.