कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महाडिक उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ओढा पुनर्जीवन कार्यक्रम २०२२ अंतर्गत, छत्रपती राजाराम महाराज जल सेवा अभियानास आज गडमुडशिंगी येथून सुरुवात करण्यात आली. “या उपक्रमामुळे जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन होवून त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीक्षेत्राला व जलसंवर्धन प्रक्रियेला लाभ होणार आहे.” असे मत राजाराम कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.
विविध भौगोलिक तसेच मानवी कारणांमुळे प्रमुख जलस्त्रोत असणाऱ्या ओढ्यांची दुरावस्था झाली आहे. त्यांचे पुनरुज्जीवन होऊन ते जर प्रवाही बनवले तर त्या क्षेत्रात पाण्याचा चांगला स्त्रोत उपलब्ध होईल. यासाठीच माजी आमदार अमल महादेवराव महाडिक यांच्या संकल्पनेतून ‘छत्रपती राजाराम महाराज जल सेवा अभियाना’ची सुरुवात करण्यात आली.
“राजाराम साखर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व 10 शेती गटांमध्ये अश्या प्रमुख ओढ्यांचे सर्वेक्षण कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. या उपक्रमांतर्गत निवडलेल्या सर्व ठिकाणी जेसीबी व इतर मशीनरीच्या साहाय्याने ओढ्यांची सफाई करणे, पात्र रुंदावणे, खोली वाढवणे व ओढ्यांना पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तेव्हा परिसरातील सर्व शेतकरी, ऊस उत्पादक यांनी परस्पर सहकार्याच्या भूमिकेतून या अभियानात सहभागी व्हावे”, असे आवाहन यावेळी अमल महाडिक यांनी केले.
यावेळी श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंत बेनाडे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, तानाजी पाटील, हरिषबापू चौगुले, पंडितआण्णा पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी – कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओढे घेतील मोकळा श्वास
जलसंवर्धनातून शेती विकास’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी लागणारी सर्व आर्थिक मदत महाडिक उद्योग समूहाकडून केली जाणार असून राजाराम सहकारी साखर कारखाना भविष्यातही अशा सभासद हिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी उपस्थित सभासदांना दिली.