‘उत्तर’साठी उद्या मतदान; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या १२ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जाहीर प्रचार थांबला असला तरी पडद्यामागच्या हालचालीसह गुप्त जोडण्या सुरु झाल्या आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी एकूण २१४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ३५७ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ३५७ ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत.उत्तर विधानसभा विधानसभा मतदार संघात एकुण ७ मतदार संघ संवेदनशील मतदार केंद्र आहेत. मतदार संघात उद्या एकुण ५५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पाच राज्यातील निवडणुकीत ८० वर्षावरील दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेतले होते. तसाच प्रयोग कोल्हापुरात केला जाणार आहे. यासाठी १२ फिरते मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

मतदानासाठी ५०२ बॅलेट युनिट, ५०२ कंट्रोल युनिट आणि ५३७ व्हीव्हीपॅट असे एकूण १ हजार ५४१ ईव्हीएम वापरले जाणार आहेत. यापैकी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर ३५७ बॅलेट युनिट, ३५७  कंट्रोल युनिट आणि ५३७ व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार असून, अन्य ईव्हीएम राखीव ठेवण्यात येणार आहेत. मतदान कर्मचारी आणि साहित्य घेऊन जाण्यासाठी तसेच मतमोजणी केंद्रांवर साहित्य आणण्यासाठी ६९ केएमटी बसेस आणि ४ जीपचा वापर केला जाणार आहे. मतदानासाठी १२० सूक्ष्म निरीक्षण आणि ३८ क्षेत्रीय अधिकार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी मतदान केंद्रांवर दिवसभर लक्ष ठेवून राहणार आहेत. मतदानाच्या दिवशी १८१ केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. २ लाख ९१ हजार ५६६ मतदार असून, सर्वाधिक १ लाख ४५ हजार ९०० इतके महिला मतदार आहेत. एक लाख ४५ हजार ६५३ पुरुष मतदार आहेत. १२ तृतीयपंथी मतदार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच २ हजार ९४१ मतदार मतदान करणार आहेत. हे मतदार १८ ते १९ वर्षे वयोगटातील आहेत.