बहिरेश्वरला मोफत पशुवैद्यकीय शिबिर

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर (ता. करवीर) येथे वीरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड व गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गोचीड, जंत, मस्टायडीज आदी जनावरांच्या आजाराबद्दल मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील सर्व दूध संस्थांनी सहभाग नोंदवला. यावेळी जनावरांच्या १,२६५ औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

वीरबॅक ही कंपनी जागतिक स्तरावर जनावरांच्या आरोग्यावर काम करते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही कंपनी दूध उत्पादकांना नवनवीन योजनांच्या माध्यमातून भेटत असते. जनावरांना आजार होऊ नयेत, आणि झाल्यास कोणती काळजी घ्यावी, कोणते उपचार करावेत, याबाबत या शिबिरात सविस्तर माहिती देण्यात आली. निरोगी जनावरेच जास्त दूध देऊ शकतात. यासाठी आपण जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता राखली पाहिजे तसेच त्यांना सकस आहार देणे गरजेचे आहे, याबाबतीत कंपनीचे अधिकारी रवींद्र धस्कट यांनी दूध उत्पादक सभासदांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी कंपनीचे रोहित येवले, गोकुळचे अधिकारी के. वाय. पाटील, संजय पाटील, महादेव टिंगे, प्रदीप पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल चौगले, डॉ. सुरेश मोरे, डॉ. प्रकाश दिंडे, डॉ. ओंकार हवालदार, डॉ. नीता सुतार आदींनी परिश्रम घेतले.