मुंबई : कन्नडिगांचे सीमा भागातील मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करणार नाही. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार आम्ही चालू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिला.
मुंबईत भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मातृभाषेचं मंदिर आजच्या शुभमुहूर्तावर उभं राहात आहे. भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचे स्मारक ही येथे जवळच आहे. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे. मराठी भाषेत बोला, असं म्हटलं की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय मला त्याची काळजी नाही. इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही.राज्यात मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या इथं मराठीत असल्याच पाहिजेत. पण आपण जेंव्हा असा आग्रह धरतो आणि यामुळे ज्यांच्या पोटात दुखते त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल.
·