कोल्हापूर : उकाड्याने त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाच्या शिडकाव्याने थोडा दिलासा मिळाला. कोल्हापुरात अनेक ठिकाणी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली.
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उष्णता वाढल्याने उन्हाच्या कडाक्याने अंगाची काहिली होत होती. तर आज सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सकाळी दहा-अकरा वाजल्यानंतर बाहेर पडल्यास उन्हाचे चटके बसत होते. भरदुपारी उकाड्यात आणखी वाढ झाली. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले. साडेपाच-सहाच्या सुमारास आभाळ अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला आणि शहरात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक, फेरीवाले, दुकानदार, दुचाकीस्वार यांची तारांबळ उडाली. शहराच्या सर्वच् भागात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मात्र हा पाऊस हवेत गारवा निर्माण करू शकला नाही.