शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेने महाराष्ट्रातील निवडक 12 मुलींसाठी गिर्यारोहणाच्या संपूर्ण प्रशिक्षणासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. याच मुलींच्या प्रशिक्षण शिबिराला बसाल्ट क्वीन असे नामकरण केले होते.
शिवदुर्ग च्या प्रशिक्षकांनी जे प्रशिक्षण दिले होते त्या सर्व प्रशिक्षकांना महिला दिनी मुलींच्याकडून गुरु दक्षिणेची भेट देण्यासाठीच भैरवगड कातळ भिंती वरील चढाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.’मोरोशी’ भैरवगड या किल्ल्याची उंची ४००० फुट असून किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग आहे , माळशेज डोंगररागेतील हा किल्ला ठाणे जिल्हयात असून अत्यंत कठीण श्रेणीत गणला जातो.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे भैरवगडाचा बालेकिल्ला. तो अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या ५०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसवलेला आहे.महिलादिनानिमित्त गिरिजा धनाजी लांडगे १२ वर्षे (भोसरी), खुशी विनोद कांबोज – २१ वर्षे (कोल्हापूर ) अरमान मुजावर – २२ वर्षे ( तासगाव सांगली ) या तिघींनी मिळून ही मोहीम यशस्वी केली.