सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेट देत स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतीला दिवसा दहा तास वीज द्या, या मागणीसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करत असून सरकारने सांगितल्याप्रमाणे १५ दिवसाच्या आत शेतीला दिवसा विजेचा निर्णय घ्यावा, अन्यथा त्यानंतर सरकारविरोधात आरपारची लढाई करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

दरम्यान, पाच एप्रिलला कोल्हापुरात राज्य कार्यकारिणी घेणार असून त्यात आंदोलनाची दिशा ठरणार असल्याची घोषणा त्यांनी केली.यावेळी राजू शेट्टी म्हणाले, शेतीला दिवसा वीज देणे सरकारला शक्य आहे. आम्ही हक्काचे मागतो आहोत. विजेसाठी जमिनी आमच्या, धरणं आमच्याच जमिनीवर बांधली, पुर्नवसन देखील आमच्या शेतकऱ्यांच्या जागेत. त्यात मदत देताना तुटपुंजी मदत दिली गेली. मग दिवसा वीज देताना शेतकऱ्यांना वाईट वागणूक कशासाठी देता? महापुरात मदत देताना सरकारने आमची शुध्द फसवणूक केली आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वास उरलेला नाही.

मुंबईतील बैठकीत अधिकार्यांनी आपलेच घोडे दामटवण्याचा प्रयत्न केला. स्लॉटमध्ये बदल करून दिवसा वीज कशी शक्य आहे, याचा प्रस्तावच आम्ही ठेवला आहे. सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत स्लॉट दिले आहे. जेणेकरून दुसऱ्यावर आमचा भार पडणार नाही. या प्रस्तावावर समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त २००० मेगॅवॅट वीज खरेदी करून १०० ते १५० कोटीचा भार पडणार आहे. “सरकारने आता आपला बाप दाखवावा नाही तर श्राध्द घालावा.” वीज बील चुकीची असल्याचे मान्य करून तालुकास्तरीय मेळावे घेऊन त्वरीत दुरूस्त करण्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मान्य केले आहे. शेतकरी काही फुकटे नाहीत. आम्हाला फुकट वीज नको, पण दिवसा वीज द्या, बिले दुरूस्त करून द्या, शेतकरी वीज बील भरायला तयार आहे. सरकारने आपला निर्णय १५ दिवसात घ्यावा, अन्यथा आघाडी सरकारविरोधात आरपाईची लढाई केली जाईल.
यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, अण्णा चौगुले, राजेंद्र गड्ड्यान्नावर, वैभव कांबळे, विठ्ठल मोरे, राम शिंदे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सागर कोंडेकर, शैलेश चौगुले, संपत पवार, पोपट मोरे, महेश खराडे, शमशुद्दीन संदे, रमेश भोजकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.