पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रो तसेच विविध विकासकामांचा प्रारंभ होत आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करत ‘मोदी गो बॅक’ असे बॅनर झळकावले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे दुपारी पावणे बारा वाजता कार्यक्रमस्थळी आगमन होणार आहे. दरम्यान मोदींच्या दौऱ्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंदोलन सुरू केले आहे. अलका चौकात काँग्रेसचे तर पुणे रेल्वे स्थानकासमोर राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पंतप्रधानांना काळे झेंडे देखील दाखवण्यात येणार आहेत. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं असून पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत मार्गात कार्यकर्ते अडथळा आणणार नाहीत याची काळजी पोलिसाकडून घेतली जात आहे.