देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन तसेच विविध विकासकामांची पायाभरणी व पुणे मेट्रो चे उद्घाटन झाल्यावर एमआयटी महाविद्यालयात त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदींनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली. मोदी म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. पुण्यात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्पाचे लोकार्पणही माझ्या हस्ते करण्यात आले. देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे.पुणेकरांना आज इलेट्रॉनिक बस, मेट्रो मिळाली. मेट्रोमुळे पुणेकरांचे जीवनमान उंचावेल. त्यामुळे पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी.

कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी भूमिपूजन व्हायची, पण लोकार्पणाची शाश्वती नसायची, असा खोचक टोला काँग्रेसला लगावला.