जोतिबा देवस्थान घेणार दोन अश्व

कोल्हापूर: दख्खनचा राजा श्री जोतिबाचा मानाचा अश्व म्हणून देवस्थान समिती दोन अश्व घेणार आहे. समितीकडे आठ अश्वांचा प्रस्ताव आला आहे.रविवारचा खेटा आणि पालखी मानाच्या अश्वाविना होणार आहे.श्री जोतिबाचा मानाच्या अश्वाचा मृत्यू झाला.

यानंतर मानाच्या अश्वासाठी आठ देणगी स्वरूपातील प्रस्ताव आले आहेत. या सर्वांची उद्यापासून पाहणी केली जाणार असून त्यापैकी दोन अश्व जोतिबा देवस्थानसाठी घेतले जाणार आहेत.जोतिबा यात्रेत सासनकाठी समोर व दर शनिवारी जोतिबासमोर आणि रविवारी पालखीला मानाचा अश्व असतो. यात्रेसाठी काही दिवसांचा कालावधी असल्याने अश्व घेण्याची प्रक्रिया गतीने केली जाणार आहे.

नऊ-दहा महिन्याचे हे अश्व असतील, त्यांना महिनाभर प्रशिक्षणही दिले जाणार आहे.यापूर्वी चार महिने मानाचा अश्व पोहाळे येथील देवस्थानच्या जागेत ठेवला जात होता. आता हे दोन्ही अश्व नेहमी पोहाळे येथे ठेवले जाणार असून दर आठवड्याला ते डोंगरावर आणले जातील. या अश्वांना आता गवती चारा बंद करण्यात येणार असून भूसा आणि हरभर्‍यावरच अधिक भर दिला जाणार असल्याचे समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.