राणेंना अटक झाल्यावर, त्यांचा राजीनामा का घेतला नाही : शरद पवार

पुणे : नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, असं बोलताय. नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. उद्या कदाचित त्याचा खुलासा करतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार लगावला.

पुणे येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना यातना देण्याचा प्रयत्न जाणुनबुजुन केला जातोय मात्र याविरोधात संघर्ष करणार. गेली २० वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असे चित्र दिसले नाही मात्र आताच दिसले. एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचं. कारण नसताना हा आरोप केला जातोय असेही शरद पवार म्हणाले. मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक यापध्दतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याची चिंता करण्याचे कारण नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.