सांगली : सांगली शहराचे पाणी प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरी नाल्यातून पुन्हा दूषित पाणी नदीपात्रात मिसळू लागले आहे. या पाण्यामुळे सांगली व कुपवाडकरांना दूषित पाणी पुरवठा होणार आहे.
औद्योगिक क्षेत्रासह विविध भागातील सांडपाणी वाहून येणारा शेरी नाला पुन्हा नदीपात्रात सोमवारी प्रवाहित झाला. शेरीनाला ज्या ठिकाणी नदीपात्रात मिसळतो त्याच्या खालील बाजूस महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे पंपगृह आहे. यामुळे नदीपात्रात मिसळणारे दूषित पाणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पिण्यासाठी उपसल्या जात असलेल्या पाण्यामध्ये मिसळत आहे. हे दूषित पाणी नदीत मिसळण्याऐवजी शेतीसाठी वापरले जावे याकरिता महापालिकेने धुळगाव योजना तयार केली. मात्र, या योजनेचे पंप बंद असतील तर या दूषित पाण्याचा उपसा न होता ते सरळ नदीत मिसळते. एकीकडे महापालिकेकडून कृष्णा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली जात असताना शेरी नाल्याचे दूषित पाणी मिसळू नये यासाठी प्रभावी प्रयत्न केले जात नाहीत याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.