कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये २०१७ ते २०२१ या कालावधीत झालेल्या गैरव्यवहाराची धर्मादाय आयुक्तांमार्फत किंवा स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, त्याबाबत कायदेशीर कारवाई करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून पुढील कार्यवाही करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे.
समितीचे तत्कालीन सचिव विजय पोवार, अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी व अंबाबाई मंदिराचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याबाबत स्वतंत्र दोषारोपपत्र करण्यात आले आहे.देवस्थान समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवर आधारित मालिका २७ नाेव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान झाली.
प्रमोद सावंत, डॉ. सुभाष देसाई व जिजाऊ ब्रिगेड व अन्य संस्थांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भ्रष्टाचाराविरोधात चौकशीचे हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देवस्थान समितीचे प्रशासक म्हणून त्यांनी देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष आणि समिती सदस्य, माजी सचिव विजय पोवार आणि अंबाबाई मंदिराचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याविरोधात प्रत्येकी स्वतंत्र दोषारोपपत्र तयार केले आहे.