ऐतिहासिक पन्हाळगडाच्या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या निधीला आदित्य ठाकरेंकडून हिरवा कंदील

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर लाईट, साउंड, लेझर शोसाठी बारा कोटींचा निधी देण्यात यावा, या आपल्या मागणीला राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

याविषयी पर्यटन विभागाच्या संचालकांकडे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अवर सचिवांनी अभिप्राय मागविला.पन्हाळगडावर या प्रकल्पासाठी बारा कोटींचा निधी मंजुरीचा आदेश रात्री उशिरा मिळाला असून, यातील पहिले तीन कोटी रुपये नगरपरिषदेकडे जमा झाल्याचे नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी सांगितले. यासाठी खासदार धैर्यशील माने व आमदार डॉ. विनय कोरे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.खासदार धैर्यशील माने म्हणाले,आपण काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन, ऐतिहासिक पन्हाळगडावर लाइट, साउंड, लेझर शोसाठी बारा कोटींचा मंजूर निधी तांत्रिक मान्यतेअभावी परत गेल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच हा निधी पुन्हा मंजूर करावा, अशी मागणी केली होती. सेना-भाजप सरकारच्या काळात २०१६/१७ साली जिल्हा पर्यटन विकास योजनेंतर्गत पन्हाळगडावर या प्रकल्पासाठी बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक मान्यता वेळेत न मिळाल्याने हे काम पूर्ण झाले नाही.पन्हाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व, गडाला भेट देणारे पर्यटक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित लाइट, साउंड, लेझर शोचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित परत गेलेला निधी पुन्हा मंजूर करावा, अशी मागणी केली होती. यावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी योग्य कार्यवाही करत पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या अवर सचिवांकडे हा प्रस्ताव पाठवला.