जळगावः जळगावमध्ये थंडीच्या भीषण कडाक्याने 4 जणांचा काकडून मृत्यू झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलीय.
विशेष म्हणजे हे चारही जण बेघर होते. ते रस्त्याच्या कडेला झोपले होते. मात्र, रात्री तापमान साडेसात अंशापर्यंत खाली गेले. त्यात सुटलेले बोचरे वारे. यामुळे या चारही जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. एकीकडे सामान्यांना घर देण्यासाठी सरकार नाना घोषणा करते. मात्र, दुसरीकडे केवळ निवारा नसल्याने थंडीमुळे असे रस्त्यावर कुत्र्या-मांजरांप्रमाणे माणूस मरून पडणे, हे भीषण त्रासदायक वास्तव आहे.
यापासून सरकार आणि आपण समाज म्हणून काही बोध घेणार का, हा प्रश्नय. हा एक प्रकारचा क्राईम असून, एक संसस्कृत समाज म्हणून हे अपराधित्व आपल्याला नक्कीच झटकता येणार नाही.उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट सुरूय. त्यात नाशिक, जळगाव, धुळे येथील तापमान कमालीचे घसरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवारा नसलेल्यांचा प्रश्न अग्रक्रमावर आलाय. राज्यभरातील अनेक शहरात अनेक ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली, बस स्टँडवर आणि वेगवेगळ्या चौकात असे बेघर झोपलेले पाहायला मिळतात. मात्र, या थंडीने त्यांचा घात होत असल्याचे समोर आले आहे. जळगावमध्ये मृत पावलेले चारही जण भीक मागून उदरनिर्वाह करायचे. त्यातील एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौक, एकाचा मृतदेह निमखेडी रस्त्यावर, एकाचा मृतदेह रेल्वे स्टेशनवर तर एकाचा मृतदेह जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. या चारही जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अजून त्यांची साधी नावे सुद्धा प्रशासनाला कळू शकली नाहीत.अंगावर पांघरुण नाही…मृत पावलेले चारही जण रस्त्याच्या कडेला झोपले होते. सोमवारी मध्यरात्री तापमान साडेसात अंशावर गेले. मात्र, त्यात सुटलेले बोचरे वारे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या सामान्यांच्य अंगावरही काटा येत होता. या चौघांच्या अंगावर साधे पांघरुणही नव्हते. या थंडीमुळेच त्यांचा गारठून मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, शवविच्छेतदनानंतर अजून काही कारण समोर येऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.