सातारा : सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील एका खाजगी सावकाराने व्याजांच्या पैशासाठी एका दाम्पत्याचा क्रूरपणे छळ केला आहे.30 हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात आरोपींनी एका वर्षाच चौपट रक्कम वसूल केली आहे.
तरीही सावकाराची भूक भागली नाही, त्यामुळे आरोपी सावकाराने पीडित दाम्पत्याच्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीला उचलून नेलं आहे. आरोपींनी आईच्या कुशीतून बाळाला ओढून नेलं होतं. चार महिने बाळाची आईपासून ताटातूट केल्यानंतर, अखेर पीडित दाम्पत्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत. आरोपी सावकार दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची कसून चौकशी केली आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील मंगळवार पेठ परिसरातील ढोणे कॉलनीत राहणाऱ्या अभिषेक कुचेकर यांनी आर्थिक अडचणीतून सदर बाजार परिसरातील एका दाम्पत्याकडून 30 हजार रुपये व्याजाने घेतले होते.फिर्यादी कुचेकर यांनी मुद्दल आणि व्याज मिळून 60 हजार रुपये आरोपी दाम्पत्याला परत केले. एका वर्षाच चौपट व्याज वसूल करून देखील आरोपी सावकार दाम्पत्याची भूक भागली नाही. आरोपींनी सतत कुचेकर यांच्याकडे पैशांची मागणी केली. एवढंच नव्हे तर आरोपी सावकाराने चार महिन्यांपूर्वी कुचेकर यांच्या दोन महिन्याच्या चिमुकलीला उचलून नेलं आहे.