धुळे: धुळ्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाला गालबोट लागलं आहे. साक्री नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात गेल्यानंतर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विजयानंतर भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना तेथून जाणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. यादरम्यान शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू झाल्याने वातावरण तापलं आहे.
साक्री नगरपंचायतीमधील प्रभाग ११ मध्ये भाजपा उमेदवाराचा विजय झाला आणि शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. यावेळी विजयी उमेदवार आणि शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांच्या परिवारातील सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांनाही मार बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि मृत्यू झाला. मोहिनी नितीन जाधव असं या महिलेचं नाव आहे.