कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या 20 दिव्यांग व्यक्ती व 9 संस्थांचा, जिल्हा परिषदेच्या वतीने, शुभेच्छापत्र व दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 चे मराठी अनुवादित पुस्तक देऊन, आज बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहामध्ये सत्कार करणेत आला. तसेच त्यांना पुढील दिव्यांग क्षेत्रातील केल्या जाणाऱ्या कामकाजासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, यावर्षीपासून दिव्यांग शाळांना त्यांच्या प्रवर्ग निहाय वेगवेगळे साहित्य देण्यात येणार आहे. तसेच कोरोना व महापूराच्या काळामध्ये सर्व ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रत्येकी रुपये 500/- सानुग्रह अनुदान वाटप करणेत आले आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन दिव्यांगांच्या उन्नतीसाठी कटिबध्द राहील अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेने दिव्यांगांप्रती कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्हा परिषद त्यांच्या कायम पाठीशी राहील असे सांगून दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुढील कामकाजासाठी अध्यक्ष पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष जयवंत शिंपी, समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ, महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, तसेच सदस्य अरुण इंगवले,विनय पाटील, सुभाष सातपुते, मनिषा माने, परवीन पटेल, स्वाती सासणे, उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ यांनी केले. आभार समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी मानले.