कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. आज (शुक्रवारी) संपूर्ण १५ जागेचा निकाल जाहीर झाला. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे ११ उमेदवार विजयी झाले असून, विरोधी राजर्षि शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला ४ जागेवर विजयाचा झेंडा फडकवता आला.
खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हा बँकेसाठी शर्तीचे प्रयत्न करत चार जागांवर विजय खेचून आणला. आपल्यासह बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना निवडून आणण्याबरोबरच दोन नव्या चेहऱ्यांना संचालक म्हणून निवडून आणले. पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांना २४३ मते मिळाली तर विरोधी आघाडीचे विजयसिंह पाटील यांना ३८ मते मिळाली. याठिकाणी आमदार विनय कोरे विजय झाले. भुदरगड तालुक्यातील रणजीतसिंह कृष्णराव पाटील यांना १४४ मते मिळाली. तर यशवंत नांदेकर यांना ६२ मते मिळाली. यामध्ये रणजीतसिंह पाटील विजयी झाले. अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली तर सुधीर देसाई यांना ५७ मते मिळाली. यामध्ये सुधीर देसाई ९ मतांनी विजयी झाले.
गडहिंग्लजमधून संतोष पाटील यांना १०० मते मिळाली तर विनायक उर्फ अप्पी पाटील यांना ६ मते मिळाली. संतोष पाटील विजयी झाले. आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे ९८ मतांनी विजयी झाले तर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाल्याने त्यांचा पराजय झालाशाहुवाडीत सत्ताधारी गटाला धक्का बसला असून सर्जेराव पाटील – पेरीडकर यांचा पराभव झाला आहे. तर रणवीर गायकवाड निवडून आले आहेत. रणवीर गायकवाड यांना ९९ तर सर्जेराव पाटील – पेरीडकर यांना ६६ मते मिळाली आहेत. आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाले असून भुदरगड-राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी झाले आहेत. त्याचबरोबर माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजू आवळे , भैय्या माने विजयसिंह माने, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर हे सत्ताधारी गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकंदर या निकालाचं चित्र पाहता सत्ताधारी आघाडीला विरोधी आघाडीने कडवी झुंज देत आपली ताकद दाखवून दिली आहे या निकालातून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती , सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र वेगळे पाहायला मिळेल असंच म्हणावं लागेल.
जिल्हा बँकेत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
विकास सेवा संस्था गट : सुधिर देसाई, रणवीरसिंह गायकवाड, राजेंद्र पाटील-यड्रावकर, रणजीत पाटील, संतोष पाटील, विनय कोरे
कृषी पनन गट : संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील
नागरी बँक पतसंस्था गट : अर्जुन आबिटकर
इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट : प्रताप उर्फ भैय्या माने
महिला प्रतिनिधी गट : श्रुतिका काटकर, निवेदिता माने
इतर मागासवर्गीय गट : विजयसिंह माने
अनुसूचित जाती गट : राजू बाबा आवळे
विमुक्त जाती जमाती गट : स्मिता गवळी